Latest Marathi News
Ganesh J GIF

उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं – बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप होताना दिसत आहेत.शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच फडणवीस , शिंदेवर टीका करताना दिसत आहेत. मात्र त्यांची ही टीका भाजप नेत्यांना फारशी रुचलेली नसून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. पण औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं ‘ अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

कोकणतील सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी मोदींसह भाजप, महायुतीवर तसेच नारायण राणेंवर निशाणा साधला. त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या याच टीकेला बावनकुळे यांनी X या सोशल नेटवर्किंग साईटवरून चोख प्रत्युत्तर दिलं. एक ट्विट करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच सुनावलं. तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.पंतप्रधान जी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात .सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली.

कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे साहेब कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. अशा शब्दांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.यापूर्वी बावनकुळे यांनी असंच एक ट्विट करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही सुनावलं होतं. निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण मोदी जींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं अशी टीका त्यांनी केली होती. सोलापूरमधील सभेत राहुल गांधी यांच्याकडून कथितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी मोदींवर कडाडून हल्ला चढवत टीकाही केली होती. मात्र त्यांचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना रुचलं नाही आणि त्यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला. औकातीत रहा असंही बावनकुळे यांनी राहुल यांना सुनावलं. सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं होतं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!