
एका अठरा वर्षीय तरूणीने आपल्या मित्राच्या मदतीने आईच्या डोक्यात निर्दयीपणे हातोड्याचे घाव घालून तिचा खून केल्याची घटना वडगाव शेरीमध्ये घडली आहे. जेव्हा मित्र आईच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालत होता, तेव्हा तरूणीने आईचे तोंड स्कार्फने दाबून ठेवले होते.नंतर आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली, असा बनाव तिने रचला.मात्र, हा प्रकार संशयास्पद असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. यानंतर तपासात हा खूनच असल्याचे उघड झाले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे आहे. तर यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) या दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई मंगल संजय गोखले यांच्या बँक खात्यातून मुलगी योशिता संजय गोखले हिने तिचा मित्र यश मिलिंद शितोळे याच्या मदतीने परस्पर पैसे काढले होते. ही गोष्ट आईला समजली तर मोठा गोंधळ होईल, असे वाटल्याने योशिता घाबरली होती. अखेर यावर तिने टोकाचा निर्णय घेत आईला कायमचे संपवण्याचाच कट रचला.
योशिताने तिचा मित्र यशला घरी बोलावले आणि दोघांनी मिळून आईचा खून केला.आई झोपलेली असताना योशिताने यशला घरातील हातोडा दिला.
नंतर यशने मंगला गोखले यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करण्यास सुरूवात केली.यावेळी योशिताने आईचे तोंड स्कार्फने दाबून ठेवले होते.
आईचा खून केल्यानंतर ती बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव तिने रचला.
मंगला गोखले यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूबाबत संशय आला. याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितले.यानंतर परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.तपासात हा खून असल्याचे उघड झाले.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.