
बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाकडे राज्याचे लक्ष आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक माहिती समोर येत होती. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अखेर एसआयटी चौकशीत अशोक खरातने चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच शोषण केल्याची माहिती दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचे समोर आले आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे.

अशोक खरातला नाशिक न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. एसआयटीकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती पाहता अनेक गोष्टींचा उलघडा करण्याकरीता ईडीकडून देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. बँक व्यवहारांसह मोठ्या प्रमाणातील मालमत्ता आणि युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे याची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.
एसआयटीने केलेल्या तपासात 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जात असून, त्यात ‘समता नागरी पतसंस्था’सह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. सुमारे 63 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे. अनेक खात्यांमध्ये खरात यांचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून असून, ती खाती त्याच्या मोबाईल नंबरवर चालवली जात होती, असा प्राथमिक अंदाज आहे.

