
लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
टोळक्याची लाठ्या-काठ्यांनी मारहाण, हल्ला करणारे या आमदाराचे कार्यकर्ते?, त्या पोस्टमुळे आमदार अडचणीत?
बीड – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हाके यांचे जवळचे सहकारी आणि अतिशय विश्वासू समजले जाणारे पवन कंवर आणि त्यांच्या तीन साथीदारांवर हल्ला करण्यात आला. यात पवन कंवर हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बीडच्या सावरगावजवळ मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जेवण करण्यासाठी पवन कंबर आणि त्यांचे तीन साथीदार सावरगाव येथील एका धाब्यावर गेले होते. हे चौघेही जेवण करत असताना अचानक ४० ते ५० जण तिथे आले. या सर्वांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. चौघांनाही करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत पवन कंवर गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, पायाला आणि हातालाही इजा झाली आहे. यावर हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली आहे. पवन कंवर याच्यावर हल्ला करणारे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत आरोपींचे फोटो देखील आहेत. तसेच याच कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती. यामध्ये त्याने विजयसिंह पंडित यांना उद्देशून मला काम देऊ नका, परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या, असे म्हटले होते. असागंभीरआरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आता आरोपींचा शोध घेतला जात आहे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग लावल्याच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात घडलेल्या या मारहाणीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे माजलगावमध्ये भीतीचे व वातावरण निर्माण झालं असून या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. नेमका हा हल्ला पूर्वनियोजित होता की किरकोळ वादातून झाला याबाबत अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जवळचे आणि विश्वासू म्हणून केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर ओळखले जातात. काही आठवड्यांपूर्वी गेवराई तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी पवन करवर यांनी हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.