पुणे शहर पोलिस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, भावडी तसेच आसपासच्या भागात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या अभिलेखावरील एकवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय २१ रा. जाधव वस्ती भावडी रोड वाघोली, पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. याबाबत लोणिकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित चव्हाण यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीरिता शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, नुकसान करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक बनले होते. त्यामुळे लोणीकंद पोलिसांनी सदर आरोपीच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुणे शहर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. सदरील आदेश २६ जून २०२४ पासून पुढील दोन वर्षाकरिता आहे. सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव यांनी केली आहे.