वाघोली परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने घरफोडी करुन तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी रात्री साडे नऊ ते मंगळवार सकाळी सातच्या दरम्यान तात्याश्री कॉम्प्लेक्स मधील गणेश गोल्ड अँड इमिटेशन ज्वेलरी या दुकानात घडली होती.
याबाबत शाम दामोदर वैष्णव (वय-40 रा. हॅप्पी होम सोसायटी, आव्हाळवाडी रोड, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनुसिंग जितेंद्र जुनी (वय-25 रा. रामटेकडी, हडपसर) याला मंगळवारी रात्री वानवडी परिसरातून अटक केली आहे. तर त्याचे साथीदार सनीसिंग जितेंद्र सिंग जुनी व अशुसिंग टाक यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाम वैष्णव यांचे वाघोली येथील तात्याश्री कॉम्प्लेक्समध्ये ज्वेलरीचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता वैष्णव यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी दुकानाचे लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडले. दुकानाचे लोखंडी शटर मध्यभागी उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील दोन लाख 95 हजार रुपये किमतीचे 14.380 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 3 किलो 700 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, डिव्हीआर मशीन चोरून नेली.
फिर्यादी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास दुकानात आले असता दुकानाचे कुलूप तुटल्याचे दिसले. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. आरोपी सोनुसिंग जुनी याला मंगळवारी रात्री अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु असल्याचे एपीआय गोडसे यांनी सांगितले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी भेट दिली.