
माझ्यावर प्रेम कर, लग्न कर नाही तर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेल
रोड रोमिओमुळे पोलिसाच्या मुलीने केली आत्महत्या, पोलीसाचे कुटुंबच असुरक्षित
धाराशिव – राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्याचबरोबर महिला अत्याचाराचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. इतकच नाही तर पोलीस आणि त्यांचे कुटुंब देखील सुरक्षित नसल्याचे तुळजापूर मध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात समोर आले आहे.
तुळजापूर शहरात एक एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सारिका शिकारे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे सारिका केवळ १५ वर्षांची होती. ओंकार कांबळे याच्या त्रासाला कंटाळून तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून ओंकार कांबळे हा तरुण तिला त्रास देत होता. माझ्यावर प्रेम कर. माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन, अशी धमकी तो सारिकाला देत होता. तसेच तू माझ्याशी लग्न केलं नाही तर तुला बंदुकीने मारेन, असेही त्याने सारिकाला धमकावले होते. या सगळ्या प्रकारामुळे सारिका प्रचंड घाबरली होती. त्यातूनच तिने हे धक्कादायक पाऊल उचलले. ओंकार कांबळे याच्यावर यापूर्वीही सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.