महाराष्ट्राच्या अविनाशने बर्मिंगहॅममध्ये रोवला रुपेरी यशाचा झेंडा
काॅमनवेल्थमध्ये स्टीपलचेस प्रकारात पदक जिंकणारा ठरला पहिलाच भारतीय
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- बर्मिंगहॅम मध्ये सुरु कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने चमकदार कामगिरी केली आहे. साबळेने तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाला गवसणी घातली.या प्रकारात पदक जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अविनाश हे यश अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले आहे. आज जरी सगळीकडे या यशाबद्दल अविनाशचे अभिनंदन केले जात आहे.पण अविनाशच्या पाठीवर पहिली काैतुकाची थाप ही यशवंतराव चव्हाण सेंटरने २०२१ चा यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार देऊन दिली होती.
राैप्यपदक जिंकताना अविनाशने राष्ट्रीय विक्रम मोडत 8:11.20 अशी वेळ घेत पदक जिंकले. तो सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूशी फक्त थोड्या अंतरावर होता.अगोदर या क्रीडा प्रकारात केनियाच्या खेळाडूंचे वर्चस्व असायचे पण अविनाशने त्यांचे वर्चस्व मोडत नवा विक्रम नोंदवला आहे. अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा आहे. या क्रीडा प्रकारात येण्याचा त्याचा कोणताही विचार नव्हता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो भारतीय सेनेतील महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता. तिथ त्याच्या सैन्य प्रशिक्षकाने त्याला स्टीपलचेसमध्ये धावण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अविनाशने २०१८ साली भुवनेश्वर येथे झालेल्या ओपन नॅशनल स्पर्धेमध्ये ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:२९.८८ वेळ नोंदवत ३० वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला.तर २०१९ साली फेडरेशन कपमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केला. त्याच्या या महत्वपूर्ण कामगिरीमुळेच अविनाशला यशवंतराव चव्हाण क्रीडा पुरस्कार देऊन गाैरवण्यात आले होते. हा पुरस्कार त्याच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला. काॅमनवेल्थमधील यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार सुप्रिया सुळे यासह अनेकांनी अविनाशचे काैतुक केले आहे.
एकेकाळी एका भाकरीची चिंता असलेला अविनाश आज एकामागून एक विक्रम प्रस्थापित करत पदकांची कमाई करत आहे त्याचे हे यश अनेक भावी खेळाडूंना मार्गदर्शन ठरणार आहे. आगामी काळात देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा अविनाशने व्यक्त केली आहे. त्यामुळे यापुढेही त्याच्याकडून चमकदार कामगिरी आशा भारतीयांना असणार आहे.