
मराठी माणसे कचरा आहेत, आमच्या जीवावर तुम्ही जगत आहात
परप्रांतीय महिलेची डी मार्टमध्ये मराठी तरुणाशी अरेरावी, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल, अखेर माफीनामा
कल्याण – कल्याणमध्ये पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध मराठी आणि परप्रांतीय मुद्दा चर्चेत आला आहे. एका महिलेने डी मार्टमध्ये मराठी तरुणासोबत गैरवर्तन केले होते. पण मनसेने दिलेल्या दणक्यानंतर महिलेने सर्वांची माफी मागितली आहे.
एक महिला डी मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी आली होती. त्यावेळी स्टोअरमधील कर्मचाऱ्याला हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह केला. मात्र, त्या कर्मचाऱ्याने आपण मराठी असून मराठीतच बोलणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. अचानक या परप्रांतीय महिलेने रागाच्या भरात त्या ग्राहक सेवेतील आगरी समाजातील मुलाला मराठीतून बोलत ‘ तू हिंदीतून का बोलत नाहीस. तू हिंदीतून बोल. तु काय बोलतो ते मला समजत नाही. मराठी माणसे कचरा आहेत. आम्ही (परप्रांतीय) आहोत म्हणून तुम्ही आहात. आमच्या जीवावर तुम्ही जगता’ अशी भाषा वापरत दादागिरी केली. यावेळी त्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या ठाकरे गटाच्या कांचन खरे यांनी पुढे होत, त्या परप्रांतीय महिलेला उद्देशून आपण स्वत: मराठीतून बोलता. मग त्या ग्राहक सेवेतील आगरी समाजातील मुलाला तुम्ही का हिंदी बोलण्याची सक्ती करता. त्याला हिंदी येत नाही हे तो मुलगा सांगतो. तरी तुम्ही त्रागा करत त्या मुलाला का जबरदस्तीने हिंदी बोलण्याची सक्ती करता आणि मराठी ही आमची अभिजात, मातृभाषा आहे. तुम्ही महाराष्ट्र, मराठी भाषेला कचरा कसे म्हणता. तुम्हाला हा अधिकारी कोणी दिला, असे प्रश्न केले. यामुळे ती महिला गांगरली, तेवढ्यात तिथे मनसेचे पदाधिकारी दाखल झाले. त्यामुळे ती महिला घाबरली, आणि तिने झाल्याप्रकाराबद्दल माफी मागितली. त्यानंतर असा प्रकार होणार नाही अशी समज देऊन सोडून देण्यात आले. पण यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेमुळे भाषिक वादाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मुंबई आणि शेजारील शहरांमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत. मध्यंतरी हा मुद्दा थेट राष्ट्रीय स्तरावर गाजला होता. मनसे आणि ठाकरे गट आक्रमक असताना शिवसेना मात्र शांत आहे.