
पळून जाण्यास नकार दिल्याने विवाहित प्रेयसीची हत्या
विवाहितेच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा, मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर, अक्षयने पूजासोबत काय केले?
सातारा – साताऱ्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची राहत्या घरी गळा चिरून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला होता . या हत्येमागचे ठोस कारण शोधण्यास पोलिसांना यश आले आहे.
पूजा प्रथमेश जाधव असे हत्या झालेल्या मुलीचे नाव होते. तर अक्षय रामचंद्र साबळे असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलीसांनी सांगितले की, पूजा जाधव हिचा सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पती प्रथमेश हा साताऱ्यातील एका दुकानात काम करतो. सोमवारी कोणी नसताना अक्षयने पूजाची हत्या केली होती. पूजाचे आणि अक्षयचे सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. आपण पळून जाऊन लग्न करू, असा तगादा अक्षयने पूजाकडे लावला होता. पूजा एकेदिवशी माझ्याशी लग्न करेल, या आशेवर अक्षय होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या कोणा मुलीसोबत लग्नही केेले नव्हते. काही दिवसापूर्वी पूजा पळून जाण्यास तयार झाली होती. पण घटनेच्या दिवशी मात्र पळून जाण्यास तिने नकार दिला. यावर संतापलेल्या अक्षयने कटरच्या साह्ह्याने पूजाच्या गळ्यावर वार केले. यात ती रक्तबंबाळ झाली. पूजाचा मृत्यू झाल्यानंतर अक्षय याने महामार्गावरून येऊन एका ट्रकमध्ये बसून पुणे गाठले.दरम्यान पूजा आणि अक्षय या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या मोबाईलमधून आणखी बरीच माहिती समोर येणार आहे. दोघांचेही चॅटिंग, काॅल तपासले जात आहेत.
पोलिसांना पूजाचे अक्षय साबळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे धागेदोरे हाती लागले होते. त्यामुळे पोलीसांनी त्यादृष्टीनेच तपास केला होता. विशेष म्हणजे पूजाला अक्षयसोबत संबंध ठेवू नको, असे जवळच्या लोकांनी समजावले होते, पण पूजा तसेच वागत होती, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.