
पती आणि त्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीकडून शिविगाळ आणि मारहाण, प्रेयसीकडूनही मानसिक छळ, माधुरीसोबत काय घडलं?
पुणे – विवाहबाह्य संबंधाबद्दल जाब विचारल्याने शिवीगाळ आणि मारहाण झाल्याने, तसेच नवऱ्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. आंबेगाव परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी विकास कोकणे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विकास बाळासाहेब कोकणे आणि प्रेयसी अर्चना अहिरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हा प्रकार डिसेंबर २०२३ ते १० मे पर्यंतच्या कालावधीत घडला. माधुरी आणि विकास कोकणे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र विकास आणि अर्चना यांचे विवाहबाह्य संबंध होते. याबाबत दोघांमध्ये सतत वाद होत होता. एकेदिवशी माधुरीने पतीला याचा जाब विचारला. त्यानंतर विकासने शिवीगाळ करत तिला मारहाण केली. तसेच अर्चना हिच्या सांगण्यावरून विकासने पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरूच ठेवले होते. विकासने ‘व्यवसायासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणून दे मी तीचा नाद सोडतो’, असे सांगितले. तर अर्चनाने माधुरीला वारंवार फोन करुन ‘तु तुझ्या नवर्याला सोडून दे मला त्याच्याशी विवाह करायचा आहे’, असे म्हणत मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून माधुरीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
माधुरी कोकणे हिचा भाऊ आशिष राजाभाऊ अलगट यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.