
आसाराम बापूला गुरू करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा छळ म्हणून आत्महत्या
सासुकडून मयुरीचा छळ, आसाराम बापुची औषधे आणि धागा बांधण्यासाठी दबाव, मयुरीचा आत्महत्या नाही तर हत्याच?
जळगाव – जळगाव शहरातील सुंदर मोतीनगर भागात राहणाऱ्या विवाहिता मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात आसाराम बापूच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मे मध्ये लग्न झालेल्या मयुरीने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबरला आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात आसाराम बापूचा संदर्भ पुढे आला आहे. मयुरीची सासू मयुरीला “आसाराम बापूंचे दर्शन घे, त्यांना गुरु मान, त्यांच्याकडून औषधी गोळ्या आणि धागा घे” यासाठी सतत दबाव टाकत होती. पण मयुरीचा याला विरोध होता. त्यामुळे सासू-सून यांच्यात वाद होत होते. मयुरीच्या हाताला चार ते पाच दिवस आधी चटका दिला होता. याआधी सुद्धा तिच्या हाताला एक चटका लागला होता ती घरी माहेरी आली होती, तेव्हा तिला घरच्यांनी विचारले होते की हा चटका कसा लागला, तेव्हा तिने सांगितले की काम करताना हा चटका लागला आहे. त्यामुळे घरच्यांनी दुर्लक्ष केलं, मात्र नंतर तिच्या हाताला अजून एक चटका दिसला होता, तेव्हाही तिला विचारले असता तिने आम्हाला काहीच सांगितले नाही असे तिच्या भावाने सांगितले. तसेच तिचा मोठा दीर जो घटस्फोटित आहे हा तिच्याशी अश्लील वर्तन करायचा, असा धक्कादायक आरोप तिच्या भावाने केला आहे. मयुरी ही उच्चशिक्षित होती, तिचे बीएससी ऍग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. ती खंबीर असल्याने आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे. त्यामुळे मयुरीची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मयुरीचा नवरा गौरव ठोसर आणि तिचा मोठा दीर या दोघांना अटक केली आहे. मात्र सासू-सासरे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आधुनिक म्हणून कितीही मिरवले तरीही हुंडाबळी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.