
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप
आत्महत्येची धमकी देत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप, गर्भपातही केला, सिद्धांत बरोबर लग्न केल्याचाही दावा
छ. संभाजीनगर – राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने गंभीर आरोप केले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाटने कायदेशीर नोटीस बजावून सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडाप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
संजय शिरसाट हे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याच मुलावर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चेंबूर येथील एका फ्लॅटवर शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. धक्कादायक बाब म्हणजे, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली होती. मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने केला आहे. संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही करत नसून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. यापुर्वीही शिरसाट अडचणीत आले होते. औरंगाबाद येथे केटरिंगचा व्यवसाय करणारे श्रीशरण गायकवाड यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. याची आॅडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती.
जान्हवी शिरसाट यांच्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘सामना’शी बोलताना स्पष्ट केले आहे, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.