
प्रेमप्रकरणातून विवाहित महिलेची गळा चिरुन हत्या
घरात पूजाला एकटे पाहून अक्षयने डाव साधला, पण पोलीसांनी बारा तासातच मुसक्या आवळल्या, नेमक काय घडलं
सातारा – सातारा जिल्ह्यातील शिवथर येथे एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरामध्ये भर दुपारी घुसून गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.
पूजा प्रथमेश जाधव असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पूजा यांचा २०१७ साली गावातीलच प्रथमेश जाधव नावाच्या युवकासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना ७ वर्षाचा मुलगा आहे. पुजाची निर्घुण हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पण पोलीसांनी वेगाने तपास करत पुण्यातून आरोपीला अटक केली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. अक्षय रामचंद्र साबळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा जाधव हिचे अक्षय साबळे याच्यासोबत गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. घटनेच्या दिवशी सासू- सासरे हे कामानिमित्त शेतामध्ये गेले होते. पती प्रथमेश जाधव हा सातारा येथील आनंद ट्रेडर्समध्ये सकाळी साडेनऊ वाजताच कामाला गेला होता, तर मुलगा यश जाधव हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून, तोही शाळेत गेला होता. त्यामुळे घरी पूजा एकटी होती. ही संधीपाहून आरोपी अक्षय रामचंद्र साबळे तिच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यामुळे संतापलेल्या अक्षयने धारदार शस्त्राने पूजाचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता. दुपारच्या दरम्यान घरातील सर्व दरवाजे उघडे असल्यामुळे शेजारी राहात असणारी वृद्ध महिला घरामध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या बारा तासात शिवथर गावातीलच अक्षय रामचंद्र साबळेला अटक केली आहे. या प्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीसांनी आरोपीला पुण्यातून रात्री उशिरा अटक केली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.