
आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते.मात्र वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कमाचे ठिकाण बदलण्याचा प्रयत्न देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जातोय.

मागीलवर्षी पालखी मंदिरात मुक्कामी असताना आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे पालखीच्या मुक्कमाचे ठिकाण बदललं जात असल्याचं बोललं जातंय. मात्र आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून पालखी विठोबा मंदिर आणि परिसराची जागा गर्दीसाठी कमी पडत असल्याचं कारण दिलंय.मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, मागील आठवड्यात सादर करण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालखी विठोबा मंदिराच्या परिसरातील जागा अधिग्रहित करुन भाविकांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आलीय. असं असताना देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची जागा बदलण्यास पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्तांनी विरोध केलाय. मात्र आळंदी देवस्थानचे विश्वस्त सोमवारी याबाबत चर्चा करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी तीन वाजता भेट घेणार आहेत.

पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर पालखीचा मुक्काम आयोजित करण्याची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जातंय. यंदाच्या आषाढी यात्रा नियोजनासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख सर्व विश्वस्त आणि देवस्थानचे विश्वस्त यांच्यात झालेल्या बैठकीनुसार आठ जुलै रोजी दुपारी तीन वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असल्याचे सोहळा प्रमुख एडवोकेट राजेंद्र उमाप यांनी सांगितले. यावर्षी नेहमीपेक्षा एक तास लवकर म्हणजेच दुपारी तीन वाजता प्रस्थान सोहळा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे उमाप यांनी सांगितले.पालखी प्रस्थान पूर्वी दरवर्षी दशमीला पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात नियोजनाची बैठक होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत माऊली पालखी सोहळ्याच्या सर्व तारखा आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आले. पालखी सोहळ्यात होणारे गोल रिंगण उभे रिंगण याशिवाय इतर प्रमुख कार्यक्रमातील अडचणी बाबतही चर्चा झाल्या. यापूर्वी पालखी सोहळा प्रमुख विश्वस्थ प्रशासन यांनी एकत्रित स्थळ पाहणी केली होती त्यानुसार बैठकीत संपूर्ण पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आल्याचे उमाप यांनी सांगितले आहे.


