
आमदार परिणय फुकेंची भावजयीला बलात्कार करण्याची धमकी
आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे फुकेंवर गंभीर आरोप, फडणवीसांकडूनही दुर्लक्ष, पहा प्रिया फुकेंचा आरोप काय?
नागपूर – भाजपाचे आमदार परिणय फुके यांच्याविरूद्ध त्यांच्याच भावजयीने गंभीर आरोप केले आहेत. परिणय फुके यांचे दिवंगत भाऊ संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. तसेच पोलीसांवरही आरोप केले आहेत.
भाजप नेते परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी आज आपली कैफियत माध्यमांसमोर मांडली. प्रिया फुके म्हणाल्या की, भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून गुंडाकरवी मला दररोज धमकावले जात आहे. मी दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मी याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनीही मला ‘बघतो बघतो’ सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप प्रिया संकेत फुके यांनी केला आहे. प्रिया फुके यांनी सांगितलं की, २०१२ मध्ये त्यांचं संकेत फुके यांच्यासोबत लग्न झालं होतं. मात्र, त्यांच्या पतीचं २०२२ मध्ये निधन झालं. त्या म्हणाल्या, “लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच संकेत फुके यांच्यावर किडनी प्रत्यारोपण झालं होतं, परंतु आम्हाला ही माहिती दिली गेली नव्हती. लग्नानंतर जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा मी विचारलं, तर मला धमकावण्यात आलं. ‘बाहेर सांगितलंस तर तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका’ अशी धमकी मिळाली. माझ्यावर अनेक प्रकारे मानसिक आणि भावनिक अत्याचार करण्यात आले. बलात्कार करण्यासाठी माणसं पाठवू अशी धमकीदेखील देण्यात आली.” संकेत फुके यांच्या निधनानंतरही हा त्रास थांबला नाही. संपत्तीवरून वाद निर्माण झाले आणि एका रात्री १०:३० वाजता मला घराबाहेर काढण्यात आलं. आजही माझ्या मागावर माणसं पाठवली जातात. जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत, असा आरोप केला आहे. दरम्यान परिणय फुके यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, की त्यांची सून प्रिया फुके नातवंडांना भेटू देत नाही आणि त्याबदल्यात पैशांची मागणी करते. त्याला उत्तर देत प्रिया फुके यांनी अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची भेट घेत त्यांना धीर दिला आहे.
प्रिया फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. पण, अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. माझ्या मुलांना सुरक्षित आयुष्य आणि मला न्याय हवा आहे, यासाठीच आपला लढा असल्याचे प्रिया फुके यांनी स्पष्ट करत न्यायाची मागणी केली आहे.