
कल्याणीनगर परिसरात पुण्यातील एका धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. राज्यभरात या घटनेची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाताला दररोज नवीन माहिती लागत आहे.यामध्ये आता आणखी एका धक्कादायक माहितीची भर पडली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी रात्री 2.30 वाजता पोर्शे कारने दोघांना उडवले होते. त्यानंतर विशाल अग्रवाल यांनी वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघातील अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल 45 वेळा फोन केला. पोलीस चौकशीदरम्यान, अपघाताच्या रात्री सुनील टिंगरे यांच्या मोबाईलवर विशाल अग्रवाल यांचे 45 मिस्डकॉल येऊन गेल्याची माहिती समोर आली .
पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सध्या या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास सुरु आहे. यामध्ये कल्याणीनगर अपघाताशी संबंधित असलेल्या लोकांच्या मोबाईलमधील डेटा आणि कॉल रेकॉर्डस तपासले जात आहेत. त्यामध्ये अपघाताच्या रात्री विशाल अग्रवाल आणि सुनील टिंगरे यांच्या कॉल रेकॉर्डविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 19 मेच्या रात्री विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवले होते. या अपघाताची माहिती समजताच विशाल अग्रवाल यांनी तातडीने सुनील टिंगरे यांना फोन केला. मात्र, सुनील टिंगरे झोपले असल्याने त्यांनी विशाल अग्रवालचा फोन उचलला नाही. तरीही विशाल अग्रवालने जवळपास 45 वेळा टिंगरे यांना फोन केला. अखेर 46 व्या वेळेला सुनील टिंगरे यांनी विशाल अग्रवाल यांचा फोन उचलला.
विशाल अग्रवाल यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पहाटे 3.45 वाजता सुनील टिंगरे तातडीने येरवाडा पोलीस ठाण्यात गेले. ते सकाळी सहा वाजता पोलीस ठाण्यातून माघारी आले. येरवाडा पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुनील टिंगरे स्पष्टपणे दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस तपासादरम्यान अग्रवाल कुटुंबीय, आमदार सुनील टिंगरे आणि येरवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे संभाषण तपासण्यात आले आहे. सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप झाला होता. मात्र, टिंगरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. आपण केवळ विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरुन आणि अपघात माझ्या मतदारसंघात झाल्यामुळे पोलीस ठाण्यात गेलो होतो. अपघाताचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर मी पोलिसांनी दोषींवर योग्य ती कारवाई करा, असे सांगून माघारी परतलो होतो, असे टिंगरे यांनी सांगितले होते.