
बीडमधील आमदाराच्या कार्यकर्त्यांची दुकानदाराला बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, कार्यकर्त्यामुळे आणखी एक आमदार अडचणीत, या कारणामुळे मारहाण
बीड – मागील काही दिवसापासून बीडमधील आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कारनाम्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.आता या यादीत आणखी एका आमदाराची भर पडली आहे. या आमदाराच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली आहे.
अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा पीए आणि आता अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या कार्यकर्त्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अशोक बाळासाहेब सोळंके असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता असलेल्या सरपंच पुत्राकडून एका दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सादोळा गावातील सरपंच कमलबाई विजयकुमार सोळंके, त्यांचे पती विजयकुमार सोळंके, मुलगा अशोक सोळंके यांनी अशोक यांना मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सादोळा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टचारासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवतो, या गोष्टीची खुन्नस धरून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर देखील आरोपींनी माझ्या दुकानात येऊन हल्ला केला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. कोर्टाने त्यांना आणखी जामीन दिलेला नाही. तरीही ते मोकाट फिरत आहेत. त्यामुळे कारवाई करावी, अशी मागणीही सोळंके यांनी केली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, आरोपी दुकानात शिरताना दिसत आहेत. दुकानात शिरल्यानंतर आरोपींनी दुकाचं शटर बंद करत दुकानदाराला मारहाण केली आहे.
सरपंच आणि त्यांच्या मुलाकडून आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे पोलीसांनी योग्य कारवाई न केल्यास २० मार्चपासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.