Latest Marathi News
Ganesh J GIF

आई बहीण बाहेर गेल्या आणि संस्कृतीसोबत घडले विपरित…

संस्कृती राऊत प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश, संस्कृतीसोबत त्या दिवशी काय घडले?

अमरावती – अमरावतीच्या गाडगे नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जिजाऊ नगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या संस्कृती संजय राऊत या युवतीचा मृतदेह २८ जानेवारीच्या संध्याकाळी तिच्याच घरात सापडला होता. पण आता पंधरा दिवस उलटूनही याबाबत कोणताही सुगावा सापडलेला नाही.

संस्कृती राऊत हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अमरावती पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. संस्कृतीचे वडील संजय राऊत हे पोलीस कर्मचारी आहेत. २८ जानेवारीला संजय राऊत यांची मोठी मुलगी संस्कृती घरात एकटी होती. संस्कृतीची आई आणि छोटी बहीण परिसरामध्ये असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. दोघीही जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना संस्कृतीच्या खोलीमध्ये तिचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत मिळाला. ओढणीच्या सहाय्याने संस्कृतीचा गळा घोटण्यात आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र घटनेच्या तीन दिवसानंतर डॉक्टरांनी संस्कृतीचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना दिला. यात श्वास कोंडल्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृत्यूआधी संस्कृतीची कुणासोबत तरी झटापट झाल्याचा संशय पोलिसांना आहे. संस्कृतीला मोबाईलवर हाय मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचीही पोलिसांनी चौकशी केली, पण पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेले नाही. त्यामुळे संस्कृतीची हत्या कोणी केली हा गुंता अजूनही कायम आहे. संस्कृतीचे वडील पोलीस असूनही आरोपी शोधण्यात अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन संस्कृतीच्या कुटुंबासोबत चर्चा केली. यानंतर गाडगेनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला, आता पोलीस आरोपीचा माग कसा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!