
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पुन्हा एकदा दहशत माजवणारी मारहाणीची घटना समोर आली आहे. सांगवी गावात जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेला आणि तिच्या मुलाला गावगुंडांनी भर रस्त्यात बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिचं कुटुंब दहशतीत आहे. ही धक्कादायक घटना 5 डिसेंबर रोजी घडली. यापूर्वीही आरोपींनी त्रास दिल्याने पीडित महिलेनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. मात्र तक्रार दिल्याचा राग मनात धरत आरोपींनी रस्त्यात अडवून आई-मुलाला लोखंडी आणि लाकडी वस्तूने मारहाण केली, अशी माहिती पीडितेने दिली. ‘तक्रार का केली?’ असा प्रश्न विचारत पुन्हा अमानुष मारहाण केली गेल्याचे पीडित महिलेने सांगितले. त्यांच्या मुलालाही न्याय मागितल्याबद्दल ही जबर मारहाण करण्यात आली.

केदार कुटुंबाने याप्रकरणी पोलिसांच्या हलगर्जीपणावरही गंभीर आरोप केले आहेत. ‘पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली मात्र आरोपीवर कारवाई केली असती तर पुन्हा ही अशी घटना घडली नसती..या मारहाणीची आपबीती पीडित महिलेनं सांगितलीय. तसेच जीविताला धोका असल्याचे सांगितलेय. त्यांच्या कुटुंबाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना अद्याप अटक न झाल्याने कुटुंब घाबरलंय.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मारहाणीच्या घटना वाढत असून कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषत: केज पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. रस्त्याच्या कडेला महिलेला ओढून नेत बेदम मारहाण केल्याचे दृश्य पाहून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. केदार कुटुंबाने तात्काळ आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले असले, तरी गावकऱ्यांकडून आणि पीडितांकडून तातडीने आणि ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे. अन्यथा अशा घटनांना आळा बसणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.


