पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने खासदार नीलेश लंके हे त्यांच्या सहकाऱयांसह सोमवारपासून (दि.22) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. खासदार लंके यांनी यासंदर्भात आज पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले असून, उपोषणासाठी लाऊडस्पीकर, तसेच मंडप लावण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे.निवेदनात नमूद करण्यात आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत 11 जुलै रोजी पत्राद्वारे अवगत करण्यात आले होते. मात्र, त्याची अद्यापि कुठलीही दखल घेतली गेली नाही किंवा संबंधितांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण व आपले सहकारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीसंदर्भात खासदार लंके यांनी 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे व इतर कर्मचारी हे राजरोसपणे हप्ते घेत आहेत. हप्ते गोळा करण्याकामी रवींद्र आबासाहेब कर्डिले मदत करीत आहेत. रवींद्र कर्डिले यांची शिर्डी येथे सुरक्षा विभागात नेमणूक असतानाही तात्पुरत्या स्वरूपात त्यांची सायबर सेल नगर येथे बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही आस्थापना वेगवेगळ्या असून, दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे देण्यात आला आहे. आहेर यांच्याकडे दोन्ही शाखांचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापायी असल्याचा आरोप खासदार लंके यांनी पत्रात केला आहे.