Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात एमपीएससी करणारा विद्यार्थी मागील तीन महिन्यांपासून ‘गायब’

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयामध्ये नोकरी लागल्याचे पालकांना खोटे सांगून हा तरुण बेपत्ता झाला आहे. बुद्धभूषण पठारे असं या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात बुद्धभूषणच्या आई-वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धभूषण पठारे मूळचा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. पुण्यातील गांजवे चौक परिसरातील एका इमारतीत तो आपल्या मित्रांसोबत रहात होता. तसेच नवी पेठेतील अभ्यासिकेत तो अभ्यास करायचा. अचानक मे महिन्यात त्याने आपल्या आई-वडिलांना मंत्रालयात नोकरी मिळाली असल्याचे सांगितले.  मुलाला नोकरी लागल्याचे ऐकून आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. मुलाला शुभेच्छा देण्यासाठी आणि भेटण्यासाठी त्याच्या पालकांनी मुंबई गाठली मात्र तिथे त्यांना आपला मुलगाच भेटला नाही. त्याचा मोबाईल बंद लागला यानंतर त्याच्या वडिलांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

काही दिवसांपूर्वी मात्र अचानक त्याच्या मोबाईलवरून त्याच्या पालकांना एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करण्यात आला होता. ज्यामध्ये मी सध्या डिप्रेशनमध्ये आहे, असा उल्लेख केला आहे. यामुळे बुद्धभूषण पठारे नेमका गेला कुठे?, कोणाच्या संपर्कात तो आहे का? त्याचे कोणाशी काही वाद झाले का? याच बरोबर त्याच्याशी कोणी आर्थिक व्यवहार केले का? असा संशय पोलिसांना आहे. पोलिस या सर्व बाजूने तपास करत आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!