पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे ‘या’ कारणासाठी ठिय्या आंदोलन
कविता आणि घोषणांनी परिसर दणाणला, तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी एमपीएससी विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.
नवीन पॅटर्न २०२५ मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळू शकतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून होत आहे.विद्यार्थी म्हणाले “आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत.पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की, २०२३ पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने २०२५ मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे.राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा ,अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू” असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा जून २०२३ मध्ये आहे. लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यात पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. अभ्यासक्रम जसाच्या तसा यूपीएससीचा कॉपी पेस्ट आहे. एमपीएससीच्या मुलांना अजून संदर्भसाहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे.