
हत्या की आत्महत्या? विवाहितेच्या मृत्यू कशामुळे?
सासरच्या मंडळींवर विवाहितेच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप, पार्थिवावर तणावात अंत्यसंस्कार
नांदेड – नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या सासरच्या लोकांनी केल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. त्यामुळे भाग्यनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. दरम्यान, माहेरावरून सोने आण अशी मागणी करत तिचा छळ करुन हत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. प्रियंकाचा विवाह डिसेंबर २०२० साली नांदेड शहरातील तुळशीराम नगर येथील अभिजीत अन्नपूरे याच्याशी झाला होता. मात्र विवाहाच्या काही दिवसांनंतर लगेचच पती आणि सासरच्या लोकांनी प्रियंकाला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरू केले. २०२२ साली त्यांना मुलगा झाल्यानंतर सर्व ठीक होईल अशी प्रियंकाच्या आईवडिलांना अपेक्षा होती. पण तरीही प्रियंकाचा छळ सुरूच होता. माहेरहून दोन ते तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन ये असा तगादा प्रियंकाकडे सासरच्या मंडळींनी लावला होता. विशेष म्हणजे प्रियंका आणि तिच्या सासरच्या लोकांचा वाद महिला सहाय्यता कक्षापर्यंत पोहचला होता. त्यावेळी सासरच्या लोकांना समज देण्यात आली होती. मात्र तरीही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ सुरूच होता. घटनेच्या दिवशी म्हणजे २५ जानेवारीला घरी प्रियंका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यावेळी प्रियंकाने गळफास घेतल्याचे सासरच्या लोकांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, माहेरावरून सोने आण अशी मागणी करत सासरची मंडळी तिचा सातत्याने छळ करत होती. त्यातच काल तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून सासरच्या मंडळींनीच तिची हत्या केली असा आरोप मयत विवाहितेच्या भावाने केला आहे. आपल्या मुलीचा मृत्यू हा संशयास्पद आहे, त्यामुळे तिचे पुन्हा एकदा शवविच्छेदन केले जावे. शिवाय हे शवविच्छेदन इन कॅमेरा व्हावं अशी मागणी ही त्यांनी केली. त्यामुळे आता आता प्रियंकाच्या मृतदेहाचे पुन्हा एकदा इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. यातून अनेक गोष्टी समोर येतील असे बोललं जात आहे.या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
या प्रकरणी गंगासागर कमलेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर ठाण्यात अभिजीत अन्नपुरे (पती), शंकर अन्नपुरे (सासरा ), सीमा अन्नपुरे (सासू), अश्विनी अन्नपुरे (नंनद) या चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मस्के करत आहेत.