
माझ्या बायकोचे चार प्रियकर आहेत, मुख्यमंत्री मला वाचवा
पत्नीला घाबरलेल्या पतीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी, पोस्टर आंदोलनाचे मेरठ कनेक्शन
ग्वाल्हेर – मेरठमधील हत्याकांडानंतर अनेक पतींनी आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा धसका घेतला आहे. ग्वालियरमधील एका पतीलाही आपली हत्या होऊ शकते अशी भीती सतावत आहे. त्यामुळे त्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे मदत मागीतली आहे.
ग्वालियरचा मेहंदीवाला सैय्यद परिसरात राहणाऱ्या अमित सेनच्या पत्नीचे लग्नानंतरही अनेक प्रियकर होते. सध्या ती राहुल बाथम नावाच्या एका तरुणासह लिव्ह-इनमध्ये राहत आहे. ती आपल्या लहान मुलालाही सोबत घेऊन गेली आहे. अमितचा आरोप आहे की, पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठा मुलगा हर्षची हत्या केली आहे. तसेच, त्याला आता आपल्या हत्येची भीती सतावत आहे. अमित कुमार सेन नावाच्या तरुणाने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत आणि ती त्यापैकी एकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. अमितने याला विरोध केला असता पत्नीच्या प्रियकराने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तो म्हणाला की मी अनेकदा पोलीसांकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तो बायकोच्या त्रासाला वैतागून ग्वालियरच्या फूलबाग चौकात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याकडे मदतीची मागणी करत पोस्टर घेऊन आंदोलनाला बसला आहे. त्याने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे. कारवाई केली नाही, तर माझा ड्रम कांड होईल, अशी भीती अमितने व्यक्त केली आहे. दरम्यान त्याची पत्नी पूजा त्याला त्याच्या धाकट्या मुलाच्या नावाने फोन करते आणि पैशाची मागणी करत असल्याचाही आरोप केला आहे. दरम्यान मेरठसह अलीकडेच देशात अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, जिथे पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली आहे. त्यामुळे अमितच्या आंदोलनाची चर्चा होत आहे.
याप्रकरणी जानकगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले आहे की, अमित पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आला नव्हता, जर त्याने काही तक्रारअर्ज दिला असेल तर कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण दिले आहे . पण या पोस्टर आंदोलनाची दखल मुख्यमंत्री घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.