नागपूर हिट अँड रन प्रकरण ;”पोलिसांनी नियमानुसार जी कारवाई असेल ती करावी, कोणालाही सोडू नये” चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
नागपूरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचे नाव घेतले गेल्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. रविवारी (दि.८ ) मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर याविषयी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
दरम्यान आता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांचा मुलगा असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. नागपूर येथील अपघाताच्या घटनेतील कार ही माझ्या मुलाच्या नावावर आहे. गाडी चालवणारा, त्यामध्ये बसणारा, यांच्यावर जो काही गुन्हा दाखल होत असेल तो पोलिसांनी करावा. सर्वसामान्यांवर जी कारवाई होते, ती कारवाई माझ्या मुलावरही झाली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अपघाताच्या तपासात पोलिसांवर दबाव आणला नसल्याचा दावा केला.
ते म्हणाले, ” माझ्यासोबत काल दिवसभर गृहमंत्री होते. मी त्यांना एका शब्दाने ही काही बोललो नाही. जे नियम सर्वसामान्यांसाठी आहेत, तेच नियम या अपघाताच्या तपासात लावले पाहिजेत. गाडीत बसणारा दोषी असेल तर त्यावरही कारवाई करा. या चौकशीबाबत मी अधिक काही बोललो तर पोलिसांवर दडपण आल्यासारखे होईल.या घटनेची नियमानुसार चौकशी करून कारवाई करावी. ही गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ती गाडी चालवणारा, गाडी बसणाऱ्यावर जो गुन्हा दाखल होत असेल, तो करावा. पोलिसांना जी चौकशी करायची असेल ती करावी. कोणालाही सोडू नये”, असे माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले.