राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्या विजयाचा चाैकार
भाजपाच्या किरण पाटील यांचा पराभव, भाजपाचे मराठवाड्यात पानिपत
ओैरंगाबाद दि २(प्रतिनिधी)- औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विक्रम काळे यांनी सलग चाैथ्यावेळा विजय मिळवला आहे. तर भाजपाला मोठा पराभव सहन करावा लागला.
विक्रम काळे हे पहिल्या फेरीपासूनआघाडीवर होते. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. विक्रम काळे यांचा हा सलग चाैथा विजय आहे. निवडणुकीत विक्रम काळे यांना २० हजार १९५ मते मिळाली. तर भाजपचे किरण पाटील यांना १३ हजार ५७० मतांवर समाधान मानावं लागलं. भाजपने औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण तरीही भाजपच्या पदरात अपयश आलं आहे. यावेळी प्रचारातील चंद्रशेखर बसवनकुळे यांच्या भाषणावेळी नेत्यांचा झोपेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. भाजपाने निवडणुकीत जोर लावला होता तरीही भाजपचे उमेदवार किरण पाटील हे पहिल्या फेरीपासून तिसर्या स्थानावर होते. दरम्यान आपण गेल्या तीन टर्मपासून निवडून येत आहोत. ही आपली चौथी टर्म आहे. असं असताना आपल्याला मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विजय मिळणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही, अशी खंत विक्रम काळे यांनी बोलून दाखवली आहे.
काळे यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यातच भाजप व एकनाथ शिंदे गटानं ताकद लावल्यानं ही निवडणूक चुरशीची झाली होती. मात्र, अनुभवाच्या जोरावर विक्रम काळे विजयी झाले आहेत.