
नवविवाहित दांपत्याची गळफास घेत आत्महत्या
महिन्यापुर्वीचे झाले होते लग्न, हा वाद ठरला जीवघेणा, कुटुंबीय हादरले
बीड – बीड जिल्ह्यात ४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झालेल्या दांपत्याने गावाकडून पुण्याला राहायला जायच्या वादातून आत्महत्या केली आहे. पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील केतुरा येथे ही घटना घडली आहे. अक्षय गालफाडे व पत्नी शुभांगी असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. अक्षय हा पुण्यात लाइट फिटिंगचे काम करीत होता. लग्न झाल्यानंतर हे जोडपं पुण्यात राहायला गेले होते. मात्र, काही दिवसानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. वाद झाल्यानंतर हे जोडपे पुन्हा आपल्या मुळगावी केतुरा येथे परतले. घटनेच्या दिवशी म्हणजे बुधवारी अक्षय परत पुण्याला जात होता. यावेळी शुभांगीनेही पुण्याला राहायला जाण्याचा हट्ट धरला. अक्षयने समजावल्यानंतरही तिने ऐकले नाही. अक्षय बसमधून पुण्याला जाण्यासाठी गेला असता इकडे पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्यानंतर अक्षय परत आला. यावेळी शुभांगीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याच तणावातून अक्षयनेही शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेनं केतुरा गावासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. लहान वयात दोघांनीही टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वच जण हादरले आहेत.