
गरबा खेळताना नवविवाहिता अचानक कोसळली आणि…
विवाहितेचा पतीसोबत गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, गरबा खेळताना सोनमसोबत नेमके काय घडले, व्हिडिओ बघाच
खरगोन – भारतात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे गरब्याची धामधूम सुरू आहे. पारंपरिक आणि वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा घालून लोक नवरात्र साजरी करत आहेत. पण मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून गरब्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
खरगोन जिल्ह्यातील भेकनगाव परिसरातील पलासी गावातील १९ वर्षीय सोनम तिचा पती कृष्णपालसोबत दुर्गा पंडालमध्ये गरबा खेळत होती तेव्हा तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिची प्राणज्योत मालवली. सोनमचे १ मे रोजी कृष्णपाल याच्याशी लग्न झाले होते. नवविवाहित वधूच्या रूपात ती देवीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. सोनम ही तिच्या पतीसह कृष्णपाल गावातील सिंगाजी मंदिराच्या जवळील दुर्गा पंडालमध्ये दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. भक्तीमय वातावरणात सोनमने डोक्यावर पदर घेऊन ‘मेरे ढोलना’ या गीतावर नृत्य करायला सुरुवात केली. गाण्यावर नाचत असताना अचानक सोनम जमिनीवर कोसळली. सुरुवातीला पाहणाऱ्यांना वाटले की, तिचे पडणे हा नृत्याचा भाग आहे. पण पुढे कोणतीही हालचाल न झाल्याने जेव्हा तिचा पती तिला उचलण्यासाठी धावला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी गावातीलच एका डॉक्टरकडून सोनमची तपासणी करून घेतली, ज्यांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीत कळले की, तिला हृदयविकाराचा झटका आला होता. विशेष बाब म्हणजे सोनम पूर्णपणे निरोगी होती आणि तिची तब्येत बरी नसल्याची कोणतेही लक्षणे दिसत नव्हती, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले. पण हृदयविकाराच्या झटक्याने तिची मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मंदिरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांनाही धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका हा कोणत्याही वयात येऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.