मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे. एका दिवसातच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने नद्यांना पूर आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ४८ तासात राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे राज्यात पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर खानदेशात दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काही भागांत नाल्याकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. खरिपाच्या पिकांसह डाळिंब, पूर्वहंगामी द्राक्ष बागांना फटाका बसला आहे. पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे तर कोल्हापूरील नद्या धोक्याच्या पातळीकडे चालल्या आहेत.