(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीसह अनेक गुन्हे असलेल्या निलेश कुडलेला तडीपार केले असताना तो बेकायदेशीरपणे पुण्यात आला असताना त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मयुर सतिश पवार यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल आहे. यानुसार पोलिसांनी शुभम धोत्रे, सम्यक कांबळे, धिरज कोरके व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अर्चना टेरेस सोसायटीसमोरील रोडवर मयुर स्वीटजवळ शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर बिबवेवाडी परिसरात वाहनांवर दगडफेक करुन दहशत माजविल्याप्रकरणात १५ ते २० जणांच्या टोळक्यांमध्ये निलेश कुडले याचा समावेश होता. फिर्यादी यांच्या सोसायटीत राहणारे सम्यक कांबळे, धिरज कोरके यांच्यासोबत निलेश कुडले याची भांडणे झाली होती. निलेश कुडले याला तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो शनिवारी अर्चना टेरेस सोसायटीसमोर माऊली सासणे, आशिष सुतार यांच्याबरोबर आला होता. तेव्हा आरोपींनी त्यांना अडविले.
त्यांच्यात वाद झाल्यावर शुभम धोत्रे याने हातातील कोयत्याने निलेश कुडले याच्या डाव्या पायाचे पंजावर वार करुन त्याला जखमी केले. सम्यक कांबळे, धिरज कोरके व शुभम धोत्रे तसेच त्यांच्या बरोबर आलेल्या तिघांनी माऊली सासणे, आशिष सुतार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोढवे, पोलीस निरीक्षक खिलारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.