
रूग्णालयात घुसत कुख्यात गुंडाची गोळी घालून हत्या
गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद, गँगवारचा थरार, पॅरोल संपण्याआधीच पाळत ठेवून काटा काढला
पटना – पाटण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आज पाटण्यातील पारस रुग्णालयात एका कैद्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामुळे पुन्हा बिहारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ही संपूर्ण घटना पारस रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पाटण्यातील गँगवार समोर आले आहे. पाटणातील पारस रुग्णालयात चंदन मिश्रा उपचार घेत होता. तुरुंगात असतानाच त्याची प्रकृती बरी नव्हती. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी त्याच्यावर लक्ष ठेऊन असलेल्या एका टोळीतील गुंडानी रूग्णालयात घुसत गोळीबार केला यात चंदन जागीच ठार झाला. चंदन मिश्राची ज्यांनी हत्या केली, ते आरोपी ज्या पद्धतीने रुग्णालयात आले आणि हत्या करून गेले; त्यातून असेच दिसते की हा खून टोळी युद्धातून झाला असावा. ही हत्या पूर्वनियोजित आहे. कुणीतरी चंदन मिश्राची करत असावे, असा संशयही पोलिसांना आहे. इंडस्ट्रियल पोलीस ठाणे हद्दीत २०११ मध्ये एक दुहेरी हत्याकांड घडले होते. त्यात चंदन मिश्राचे नाव समोर आले होते. तुरुंगातील लिपीक हैदर अली यांची हत्या झाली. त्या प्रकरणातही चंदन मिश्रावर आरोप होते. हफ्ता दिला नाही म्हणून चंदन मिश्राने एका व्यापारी राजेंद्र केसरी यांचीही हत्या केली होती. याच प्रकरणात चंदन मिश्राला आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती.
चंदन मिश्राला १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पाटणा उच्च न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तो आधी बक्सर तुरुंगात होता. त्यानंतर त्याला भागलपूर तुरुंगात हलवण्यात आले होते. त्याच्या जीवाला धोक्या असल्याने पुन्हा त्याला पाटणातील बेऊर तुरुंगात हलवण्यात आले होते.