
इंन्स्टाग्राम ग्रुपवर अश्लील चाटिंगचे मेसेज करुन 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच क्लासला जाताना तिचा पाठलाग करुन शिवीगाळ केली. हा प्रकार बुधवारी (दि.10) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत खांदवे नगर आणि उबाळेनगर येथे घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (दि.12) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार सार्थक सातव याच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 78(ब), सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इंस्टाग्राम ग्रुपवरती पिडीत मुलीबद्दल अश्लील चाटिंग मेसेज पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पिडीत मुलगी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास उबाळेनगर येथे कॉलेजमध्ये जात असताना तिच्याकडे रागाने पाहून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर पिडीता दुपारी खराडी येथील क्लासला जात होती. त्यावेळी आरोपींची चारचाकी गाडीतून तिचा पाठलाग केला. त्यावेळी सार्थक गाडी चालवत होता तर इतर तीन अल्पवयीन मुले गाडीत बसली होती. आरोपींनी गाडी आडवी मारुन पिडीतेला रस्त्यात अडवले. अल्पवयीन मुलाने तिला अश्लील शिवीगाळ करुन तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास एपीआय विजया वंजारी करीत आहेत.