
बापरे! भरधाव कारने दुचाकीस्वाराला हवेत उडवले
थरारक अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, अल्पवयीन चालकाने काढला पळ, गुन्हा दाखल
छ. संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर एक हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका अल्पवयीन कारचालकाने एका दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली आहे. तसेच तो स्वतःही एका खांबाला धडकला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हडको एन-१३ भागात हिट अँड रनची घटना घडली. एका भरधाव ह्युंदाई कारने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पण सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांनी आरोपीचा माग काढला. सिटी चौक पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकाच्या वडीलावर गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलगा चालवत असलेली गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलीस स्वतः फिर्यादी होत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, ह्युंदाई कार वेगात आली आणि आधी दुभाजकावर आदळली. त्यानंतर तिने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली आणि पुढे विजेच्या खांबावर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार आणि दुचाकी हवेत उडून रस्त्यावर आदळली. या घटनेदरम्यान रस्त्यावरून तीन तरुणी समोरून चालत येत होत्या. धडक दिलेली दुचाकी त्यांच्याजवळून अत्यंत थोडक्यात गेली. सुदैवाने त्या या भीषण अपघातातून बचावल्या. पण कार खांबाला धडकल्यामुळे खांब वाकला. त्यामुळे परिसराचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस स्वतः फिर्यादी होत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
अपघातानंतर कार काही क्षण घटनास्थळी थांबली होती. मात्र नागरिकांनी धाव घेताच अल्पवयीन घटनास्थळावरून पळ काढला. दुचाकीस्वार रस्त्यावर विव्हळत पडलेला दिसून आला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला मदत केली. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.