जामीन मिळाल्याने सराईत गुन्हेगाराने काढली मिरवणुक; जल्लोष करीत लोकांमध्ये पसरविली दहशत, सराईत गुन्हेगारासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा तुरुंगापासून पुण्यापर्यंत भव्य मिरवणुक काढली होती. ही मिरवणुक राज्यभर गाजली. त्यामुळे आता छोटे मोठे गुंडही जामीन मिळाल्यानंतर मिरवणुका काढून जल्लोष करु लागले आहेत. मांजरी येथील एका गुंडाने मिरवणुक काढून जल्लोष केला. हडपसर पोलिसांनी त्याच्याबरोबरच त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार उमेश मच्छिंद्र शेलार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेश कामठे, त्याचे साथीदार गणेश शिंदे, रोहन शिंदे, अक्षय कांचन, प्रतिक कांचन, प्रकाश होले व इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मांजरीतील महादेवनगर येथे १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात ते पावणे आठ दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश कामठे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी, दरोडा व लुटमार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हॉटेल व्यावसायिकाला धमकावून लुबाडल्याप्रकरणी ऋषिकेश कामठे व त्याच्या साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात त्याला २७ जुलै २०२४ रोजी अटक केली होती. या गुन्ह्यात नुकताच त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी मांजरीतील महादेवनगर परिसरात त्याची मिरवणूक काढून जल्लोष करीत लोकांमध्ये दहशत पसरविली. पोलीस उपायुक्त श्रीधर यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याने कामठे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.