
लग्नाला विरोध केल्याने तरूणाने प्रेयसीसोबत केले विषप्राशन
तरूणीचा मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज, कुटुंबीयांचे मोठे आरोप, रिषभ पंतशी आहे कनेक्शन
मुझ्झपरनगर – भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ रोजी मोठा अपघात झाला होता. त्यावेळी रजत नावाच्या तरुणाने ऋषभ पंतचा जीव वाचवला होता. पण आता तोच रजत मृत्यूशी झुंज देत आहे. रजतने प्रेम प्रकरणातून आपल्या प्रेयसीसोबत विष प्राशन केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रजत हा मुझफ्फरनगरमधील शकरपूर येथील मजरा बुच्चा बस्तीचा रहिवासी आहे. रजतचे गावातील मनू या मुलीबरोबर गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. पण दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला परवानगी देण्यास नकार दिला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दोघेही आपापल्या घरातून आले आणि शेतात पोहोचल्यानंतर त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केला. दोघेही शेतात बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मुलीचा मनूचा मृत्यू झाला, तर रजतवर उपचार अजूनही सुरू आहेत. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी स्थळे पाहण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, दोन दिवसांपूर्वी रजतने त्यांच्या मुलीला आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर त्याने त्याला विषारी पदार्थ खायला दिले. मुलीची आई कमलेश यांनी रजत आणि इतरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या रजतची प्रकृती गंभीर आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर पोलीस त्याचा जवाब नोंदवणार आहेत.
रिषभ पंत घरी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाला होता. त्याची कार जळाली होती. यावेळी रजत आणि त्याच्या मित्राने रिषभला कार बाहेर काढले होते. त्याच्या पायाला आणि डोक्याला मार लागला होता. जर या दोघांनी त्याला बाहेर काढले नसते तर रिषभचा कारसोबत जळून मृत्यू झाला असता. रिषभ पंतने रजतला आपला जीव वाचविल्यामुळे स्कुटर भेट दिली होती.