पुणे – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. चाकणमधील मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महाळुंगे पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी देखील आयोजकांनी गौतमी पाटीलचा जाहीर कार्यक्रम घेतल्याने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. समीर रामदास गवारे, आनंद चिंतामण गवारे आणि विश्वनाथ शांताराम गवारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांची नावे आहेत.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा मंगळवारी चाकणच्या मोई येथे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या कार्यक्रमाला महाळुंगे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीदेखील परवानगी नसताना समीर रामदास गवारे, आनंद चिंतामण गवारे आणि विश्वनाथ शांताराम गवारे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून त्यांच्यावरती भा.दं. वि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की, सर्वात अगोदर तरुणाई पुढे असते. अनेकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना गौतमीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीमार करावा लागल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमाला पोलीस कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारतात, असे असले तरी गौतमीची क्रेझ बघता तिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजक जाहीरपणे घेतात. त्यानंतर मात्र आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणार असाल तर पोलीस परवानगी नक्की घ्या.