
….नाहीतर मी लग्न मोडून टाकेन, लग्नात उभं राहणार नाही
हगवणे कुटुंबीयांच्या हावरटपणाचा कहर, कस्पटेंनी कागदपत्रे सादर करत हगवणे आणि वकिलाची केली पोलखोल
पुणे – वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप हगवणेच्या वकिलांनी फेटाळून लावला आहे. तसंच आमच्याकडे इतकी संपत्ती, गाड्या असताना हुंड्यासाठी छळ का करु? असा युक्तिवाद वकिलाच्या वतीने करण्यात आला आहे. आता यावर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पुरावे सादर करत हगवणे आणि वकिलाची पोलखोल केली आहे.
पत्रकार परिषदेत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी थेट पावत्या दाखवत हगवणे कुटुंबाचा खोटारडेपणा उघड केला आहे. माझ्याकडे सोनं, चांदी, गाडी, गौरीची मागणी केली होती. तसंच फॉर्च्यूनर गाडीसाठी हगवणेंनी आग्रह धरला होता असे अनेक खुलासे त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत. ते म्हणाले वैष्णवीला आणि शशांकला १ लाख ३२ हजाराचा मोबाईल मीच १८ सप्टेंबर २०२४ घेऊन दिला होता. त्याचे आजही हफ्ते भरत आहेत,” असा खुलासा अनिल कस्पटे यांनी केला. गाडीबद्दल बोलताना कस्पटे म्हणाले की, मी एमजी हेक्टर गाडी बूक केली होती. वाकड हायवे शोरुमला गाडी बूक केली होती. ५० हजार डिपॉझिट भरंल होतं. त्यांनी त्यावरुनही माझ्याशी वाद घातला. ही जर गाडी दिली तर ती गाडी सोडून देईन नाहीतर पेटवून देईन, मला फॉर्च्यूनर गाडीच पाहिजे असं त्याचं म्हणणं होते असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्याकडे एकच गाडी आहे. जी गाडी आहे ती दुसऱ्या व्यक्तीची आहे. मी जी गाडी दिली आहे, ती मागितली होती. माझ्या मुलीचा छळ केला. लग्न मोडून टाकेन, लग्नात उभं राहणार नाही अशा धमक्या दिल्या. आधी माझ्या मुलीचं लग्न दोनवेळा मोडलं होतं. हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. लग्नाला तयार झाल्यावर त्यांनी अशी मानसिकता करुन ठेवली. माझ्याकडे सोनं, चांदी, गाडी, गौरीची मागणी केली. फॉर्च्यूनर गाडीसाठी हगवणेंनी आग्रह धरला होता, असेही कस्पटे म्हणाले आहेत. यावेळी कस्पटे यांनी हगवणे वापरत असलेल्या गाड्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे आहेत, असे सांगून सगळी कागदपत्रे सादर केली. दरम्यान वैष्णवी अन्य मुलाशी चॅटिंग करत होती. आम्ही याबाबत वैष्णवीच्या आई-वडिलांना कल्पना दिली होती. त्या मुलाने बोलण्यास नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली असावी, असा दावा हगवणे कुटंबाच्या वकिलाने केला होता.
माझ्या मुलीवर काहीही शिंतोडे उडवतील. वकीलांना मला सांगायचं आहे की तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हालाही मुलीबाळी असतील. एखाद्याच्या असाह्य मुलीवरती… माझी मुलगी तर गेलीच… ती मेल्यावर तिच्यावर शिंतोडे उडवू नका, अशी विनंती अनिल कस्पटे यांनी हगवणेच्या वकिलांना केली आहे.