संतापजनक! महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी सुरूच
परप्रांतीयाकडून मुलीचा विनयभंग करून मराठी कुटुंबाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण- महाराष्ट्रात आणि खासकरून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मराठी माणासावर अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण केल्यानंतर आता त्याच कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या पत्नीनेही मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे. मराठी तरुणासह त्याच्या पत्नी आणि आईला मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणाऱ्यामुळे मराठी कुटुंबाला परप्रांतीय दाम्पत्याने मारहाण केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार घरासमोर खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत पांडे याने अश्लील चाळे केले. पीडित मुलीच्या वडिलांनी पांडेच्या घरी जाऊन याबाबत जाब विचारला होता. मात्र, पांडे याने मुलीच्या वडिलांशीच वाद घालत त्यांना मारहाण केली. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर तिनेही याबाबत विचारणा केली असता, पांडे याची पत्नी रिना हीने मुलीची आई, आजीला मारहाण केली. या घटनेत पीडित मुलीचे वडील, आई, आजी जखमी आहेत. तसेच ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे मुलीचे वडील मुंबई पोलीस दलात कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परप्रांतीयांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.