
पाणीपुरी खाल्ल्याने त्रास आणि रूग्णालयात जीबीएसचे निदान
किरणची तीन आठवड्याची झुंज संपली, जीबीएस आजाराचा आणखी एक बळी, काय घडले?
पुणे – बारामती शहरात एका तरुणीचा जी बी सिंड्रोम आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण राजेंद्र देशमुख असं या तरुणीचं नाव आहे. तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जीबीएस सिंड्रोम रोगाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे.
बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या तरुणीचा जीबीएस सिंड्रोममुळे काल मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून तिच्यावरची उपचार सुरू होते. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. किरणला तीन आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. ती बारामतीत पोहोचल्यानंतर जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी पुण्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिचा प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. गुलेन बॅरे सिंड्रोम हा आजार गर्दीने आणि संसर्गाने होत असल्याची शंका येत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरात लवकर राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असं केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.
पुण्यामध्ये १८३ रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. २८ रुग्ण संशयित आहेत. पुण्यात आतापर्यंत १० जणांचा या आजाराने मृत्यू झाला. ४२ रुग्ण पुणे मनपा, ९४ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. दरम्यान, जगताप व खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती मध्ये कुठेही जीबीएस चे रुग्ण आढळलेले नाहीत.