पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘ही’ महत्वाची जबाबदारी
पंकजांना केंद्रात पाठवत मुंडे समर्थकांना राज्याच्या राजकारणात शह
दिल्ली दि ९ (प्रतिनिधी) – भाजपाने संघटनात्मक पातळीवर आगामी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने भाजपाने आज सर्व राज्यांचे प्रभारी जाहीर केले आहेत. या यादीत पक्ष नेतृत्वावर नाराज असलेल्या आणि पराभवानंतर अडगळीत पडलेल्या पंकजा मुंडेना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे.
आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासून तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी १५ राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे.नितीश कुमार यांनी साथ सोडल्यामुळे भाजपाला नवे सहकारी शोधावे लागणार आहेत. तर पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद देण्यात आले आहे. या राज्यात भाजपाची सत्ता गेली होती. पण भाजपाने लोटस आॅपरेशन राहवत सत्ता हस्तगत केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाचे बहुमत आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तर केंद्रीय मंत्रिपदावरून बाजुला सारल्यापासून प्रकाश जावडेकर सक्रिय नव्हते. आता त्यांना डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर भाजपने राजस्थानच्या सहप्रभारीपदाची धुरा दिली आहे. काँग्रेसचा हा गड हस्तगत करण्यासाठी रहाटकर यांना काम करावे लागणार आहे.
कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. गेल्यावेळेस थोड्या फरकाने भरलेल्या १५० लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. पण विरोधक मात्र अजूनही नेता ठरवण्यातच व्यस्त आहेत.