
पेट्रोल पंपावर सरपंचाला दोघांकडून बेदम मारहाण
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, किरकोळ कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण, सरपंच जखमी
अकोला – अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील एका पेट्रोलपंपावर दोन युवकांनी निंबा गावच्या सरपंचाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मूर्तिजापूर शहरातील बुब पेट्रोल पंपावर निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून आपल्या निंबा या गावी जात असतांना पेट्रोल भरण्यासाठी बुब पेट्रोल पंप येथे थांबले असता रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून त्यांचा दोघांबरोबर वाद झाला. या वादादरम्यान सरपंच फुके यांना २ व्यक्तींनी मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सरपंचाला पेट्रोलपंपावर बेदम मारहाण करण्यात आली. पेट्रोल पंप येथे थांबले असता रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पण ही मारहाण नेमकी रांगेत उभे राहण्यावरून झाली की आणखी काही कारण होते याचा तपास पोलिस करत आहेत. किरकोळ कारणावरून सरपंचाला मारहाण केल्याच्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
या मारहाणीमध्ये सरपंच जखमी झाले आहेत. घटनेनंतर सरपंच फुके यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.