
पोलिसांनी कोथरूडमध्ये काढली कुख्यात घायवळ टोळीची धिंड
धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, गोळीबार करत माजवली होती दहशत, गुन्हेगारी थांबणार का?
पुणे – पुण्यात अलीकडेच झालेल्या टोळी युद्धानंतर नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण आहे. तसेच पोलिसांच्या कार्य क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशातच आता पोलिसांनी यावर उपाय म्हणून गुंडांना पोलिसी हिसका दाखवत त्यांची धिंड काढली आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी साईड दिली नाही म्हणून प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केला होता.त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्याच दिवशी काही अंतरावरच सागर साठे नावाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याला उत्तर म्हणून गुंड निलेश घायवळ यांच्या गुंडांची कोथरूड परिसरात पोलिसांनी धिंड काढली आहे. यात मयूर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चादलेकर या पाचही जणांची पोलिसांनी धिंड काढली आहे. ज्या ठिकाणी या पाच जणांनी गोळीबार करून दहशत निर्माण केली होती त्याच भागातून आता पोलिसांनी ही धिंड काढली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान दुसरीकडे शिवीगाळ का करतो, याची विचारणा केल्याने दोघा भावांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करुन त्यांना जखमी करणार्या व मोक्का कारवाई केलेल्या दोघांची येरवडा पोलिसांनी त्यांच्याच भागात चंद्रमानगर येथून कॉमरझोनपर्यंत धिंड काढली आहे.
निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. तो मूळचा सोनेगाव, ता. जामखेडचा असून उच्चशिक्षित आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्याने मास्टर इन कॉमर्सची डिग्री पूर्ण केली. मात्र, शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी तो गुन्हेगारी जगतात शिरला. त्यानंतर त्याने आपली टोळी निर्माण करून कोथरूड भागात आपले साम्राज्य निर्माण केले होते.