५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात ; अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून देण्यासाठी घेतली लाच
अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. हवालदार ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय-४४) असे अटक केलेल्याचे नाव आहे.याबाबत एका ५७ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली आहे. ११ ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवड परिसरातील पुनवळे येथील हॉटेल गंधर्व शेजारी ही सापळा कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एक मोटार सायकलस्वार यांच्यात पुनावळे येथे अपघात झाला होता. हवालदार ज्ञानदेव बगाडे यांच्याकडे त्याचा तपास आला होता. या अपघात प्रकरणी जबाब नोंदवून आपसात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी बगाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली.याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
या तक्राराची पडताळणी करताना बगाडे लाच मागत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पुनवळे येथील गंधर्व हॉटेलसमोर तक्रारदार यांना बोलावले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारताना बगाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन ज्ञानदेव बगाडे याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय पवार करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.