
प्रसिद्ध अभिनेत्री विरोधात पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
न्यायालयाकडून परदेश प्रवास करण्यास बंदी, पतीवरही घातली बंदी, या कारणामुळे अटकेची शक्यता?
मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघेही सध्या ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. आता न्यायालयाने त्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे दोघांना मोठा आथिर्क फटका बसण्याची शक्यता आहे.
आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली असून, त्यामुळे त्यांनी २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान कौटुंबिक सहलीसाठी फुकेतला जाण्याची परवानगी मागत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली आहे. ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी संबंधित ईओडब्ल्यू तपास करत आहे. या पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या, गौतम अंखड यांच्या खंडपीठाने कुंद्राच्या याचिकेवर राज्य सरकारला ८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार , फुकेत सहलीसाठी हॉटेल व प्रवासाची बुकिंग कुंद्रा यांनी केली आहे. तसेच त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय प्रवास योजला असून २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान लॉस एंजिल्स येथे व्यावसायिक दौरा, २५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मालदीव, कोलंबो येथे व्यवसाय दौरा, २० डिसेंबर ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान लंडन, दुबईत पालकांना भेटायला जाणार असल्याची माहिती दिली होती. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात यापूर्वीचे दोन गुन्हेही प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देणं योग्य ठरणार नाही, याची नोंद घेत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत ही सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब केली. पुढील सुनावणीत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत. दरम्यान शिल्पा शेट्टीचा व्यावसायिक पती राज कुंद्रा अनेक वेळा वादात अडकला आहे. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा एका वादात अडकली आहे. महत्वाचे म्हणजे पुढील चौकशीत शिल्पा शेट्टीलाही ईओडब्ल्यूसमोर हजेरी लावावी लागण्याची चिन्हे आहेत.
लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडडे संचालक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलेल्या तक्रारीनुसार वर्ष २०१५ ते २०२३ या काळात झालेल्या ६० कोटींच्या आर्थिक व्यवहारात ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. शिल्पा शेट्टी तसेच राज कुंद्रा यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी हे पैसे घेतले होते. याप्रकरणी राज कुंद्रा यांचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला आहे.