माती वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई न करता वाहतूक चालू ठेवण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना बावधन वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली.ही कारवाई गुरुवारी (दि.27) बावधन वाहतुक पोलीस चौकी समोर करण्यात आली.पोलीस नाईक समाधान वालचंद लोखंडे (वय-39) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्य़ालयात तक्रार दिली होती. तक्रारदार यांचा उत्खनन केलेली माती व इतर मटेरीअल ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या माल वाहतूक गाड्यांचा व्यवसाय आहे.
पोलीस नाईक समाधान लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे उत्खननातील माती वाहून नेणाऱ्या वाहनांवर विना कारवाई वाहतुक चालु ठेवण्यासाठी प्रत्येक गाडीला एक हजार याप्रमाणे पाच गाड्यांचे पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता लोखंडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बावधन वाहतुक पोलीस चौकीसमोर सापळा लावून लोखंडे याला लाच घेताना अटक केली. त्याच्या विरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.