
प्रतीक घुलेने संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली आणि छातीवर…
सुदर्शन घुलेचा सीआयडी जवाबात धक्कादायक खुलासा, कराडचे नाव घेत म्हणाला आडवे येणाऱ्याला...
बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने सीआयडीकडे दिलेल्या जबाबात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. यामुळे कराड समोरील अडचणीत वाढ झाली आहे. घुलेने देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगत मोठे गाैप्यस्फोट केले आहेत.
प्रतीक घुलेने देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली, त्यानंतर छातीवर उडी मारल्याचे सुदर्शनने सांगितले आहे. त्याने विष्णू चाटे याच्याशी मोबाईलवर संवादही झाल्याचे मान्य केले आहे. घुलेने सांगितले की देशमुख यांना मारहाण केल्यानंतर ते निपचित पडले. मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळे त्यांना कपडे घालून गाडीत ठेवले आणि अंधार पडण्याची वाट पाहण्यासाठी तुरीच्या शेतात लपून बसले. अंधार झाल्यानंतर मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून वाशीच्या दिशेने निघून गेले. हे सर्व त्यांनी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून केल्याचेही कबूल केले. ९ डिसेंबरला देशमुख आणि त्यांचे मावसभाऊ कारमधून येत असताना दोन्ही गाड्यांनी त्यांना आडवले. त्यानंतर गाडीची काच दगडाने फोडून देशमुख यांना बाहेर ओढले. संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना टाकळी शिवारात नेल्यानंतर आरोपींनी त्यांना तब्बल दोन तास अमानुष मारहाण केली. यावेळी क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप आणि लाकडी काठी यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आला. याच मारहाणीदरम्यान प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली आणि नंतर पळत येऊन त्यांच्या छातीवर जोरात उडी मारली, ज्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली, असा धक्कादायक खुलासा सुदर्शन घुलेने केला आहे.
खंडणी न दिल्याने वाल्मिक कराडने ‘आडवे येणाऱ्याला आडवे करा’ असा निरोप दिला होता आणि त्याप्रमाणेच आपण सरपंचाला मारहाण केली, असेही सुदर्शनने म्हटले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.