
सासरच्या त्रासाला कंटाळून गर्भवती पुजाने केली आत्महत्या
महाराष्ट्रात आणखी एक हुंडाबळी, लग्नाच्या पाच महिन्यात उचलले टोकाचे पाऊल, कारण धक्कादायक
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. भरमसाठ हुंडा गाडी देऊनही सासरी होणाऱ्या जाचामुळे वैष्णवीने आत्महत्या केली. हे प्रकरण ताजे असताना आता पुण्यात आणखी एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील म्हाळुंगे येथे ही घटना घडली आहे. पूजा गजानन निर्वळ असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे गरोदर असताना तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. पूजाच्या कुटुंबीयांच्या मते, ही आत्महत्या नसून सासरच्या छळामुळे घडलेली हत्या आहे. लग्न झाल्यानंतर पाचव्या महिन्यातच पूजाने आत्महत्या केली होती. दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रुपये दिले नाही म्हणून छळ केल्याचा आरोप पूजाच्या माहेरकडच्यांनी केला आहे. पूजाने सासरच्या अत्याचाराला कंटाळून लग्नाच्या पाच महिन्यांतच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना घडली तेव्हा ती ३ महिन्यांची गरोदर होती. आमच्या मुलीची आत्महत्या झाली नसून तिची आत्महत्या झाल्याचेही तिच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पूजा आणि गजानन यांचे ३ डिसेंबर २०२४ ला लग्न झाले. त्यानंतर पूजा नवरा, सासू-सासरे, नणंद व तिच्या २ मुलांसह पुण्यातील स्पाइन सिटीत राहायला आली. सुरुवातीचे ३ महिने आनंदात गेले. मात्र नंतर गाडी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आण, असा तगादा पती गजानन निर्वळ याने पूजाकडे लावला. आधीच लग्नाची उसनवारी झाल्याने वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. येथूनच पूजाला पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली. गुडी पाडव्याला पुजाने आई वडिलांना सासरी होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. पण समजूत घालून तिला त्यांनी परत पाठवले. पूजाचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी तिवे आईसोबत शेवटचे बोलणे झाले होते. पुजाने २७ एप्रिलला आत्महत्या केली होती. पण महिना होऊनही कारवाई झाली नसल्याचा आरोप पुजाच्या आई वडिलांनी केला आहे.
या प्रकरणात हुंडाबळी, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. याबाबत सोमवारी खेड न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन गिते यांनी दिली आहे.