
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू
रुग्णालयावर सर्व स्तरातून टीकेची झोड, मुद्दा विधानसभेत उपस्थित होणार, रूग्णालय म्हणते चाैकशी करुन अहवाल....
पुणे – पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या तनिषा सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं असता, प्रशासनाने उपचारापूर्वी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यावर रूग्णालयानेही उत्तर दिले आहे.
तनिषा भिसे यांना २९ मार्च रोजी प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. कुटुंबीयांचा दावा आहे की, रुग्णालयाने १० लाख रुपये जमा करण्याची अट घातली आणि अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवूनही तिला दाखल करून घेतलं नाही. परिणामी, तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं, पण वाटेतच तिची तब्येत बिघडली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, पण स्वतःचा जीव वाचवू शकली नाही. तनिषाचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रुग्णालयाला संपर्क साधला, तरीही प्रशासनाने ऐकलं नाही. या घटनेनंतर आमदार गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवली आहे. तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी दिनानाथ रुग्णालयानं १० लाखांची मागणी केली होती. कुटुंब अडीच लाख भरण्यासाठी तयार असताना देखील या महिलेला ॲडमिट करण्यात आलं नाही. रुग्णाची अवस्था सिरिअस असताना देखील रुग्णालयानं त्यांना ॲडमिट केलं नाही, असा आरोप गोरखे यांनी केला आहे. आपन या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उचलणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने पावलं उचलली आहेत. त्यामुळे मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या प्रकरणाची पुणे महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रमुख निना बोराडे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती मागवली आहे. रुग्णालयाने प्राथमिक चौकशी सादर केली आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासनाविरोधात सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी सांगितले की, “या घटनेची चौकशी केली जाणार आहे. आम्ही राज्य सरकारला अहवाल सादर करू. मीडियात येणाऱ्या बातम्या अर्धवट आहेत. आरोपांची तपासणी होईल, पण सध्या जास्त बोलता येणार नाही.” असे म्हणत रुग्णालयाने आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे सरकारची याप्रकरणी काय प्रतिक्रिया येते ते पहावे लागणार आहे.