संचालक मंडळाने विक्रीची परवानगी दिली तेव्हापासून “शेतकरी” देशोधडीला लागला
मांजरी उपबाजारातील "खोती-व्यापारी" बंदीवर सलग सहा दिवसांपासून आंदोलन सुरु
मांजरी प्रतिनिधी – पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री असताना संचालक मंडळांनी खोतेदारांना शेतमाल विक्रीसाठी परवानगी दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळापैकी संचालक सुदर्शन चौधरी यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आंदोलनात उडी घेतली .त्यानंतर संचालक रोहिदास उंद्रे व रवींद्र कंद यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन हा बाजार शेतकऱ्यांचाच असून इथे फक्त शेतकरी ते ग्राहक असा बाजार चालणार असल्याचे सांगत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी व रयत क्रांती संघटनेचेप्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत हे आंदोलनात सहभागी होणार आहेत .तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत काळभोर हे आंदोलन सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहे .त्यामुळे आता बळीराजाला नवीन बळ येणार आहे. ही आंदोलनाची लढाई नक्कीच जिंकतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
तसेच हवेली व दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पत्रक देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. परंतु अजूनही हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसून हवेलीतील शेतकऱ्यांनी याबाबत आमदार अशोक पवार यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे .हा बाजार कुठल्याही पक्षाचा नसून फक्त शेतकऱ्यांचा आहे याचा विचार सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी करून फक्त शेतकरी बाजारासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती हवेलीतील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे . याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद यांनी सांगितले की हा बाजार फक्त शेतकऱ्यांचा असून कोरेगाव मूळ येथील जागेत खोतीदारांना परवानगी दिली असून थोड्याच दिवसात तिथे बाजार सुरू होणार आहे तसेच मांजरी बाजारात काही कडक अटी टाकून खोतीदारांना परवानगी दिली आहे. परंतु या अटीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे .त्यामुळे हा बाजार फक्त शेतकरी ते थेट ग्राहक असाच राहणार आहे. रवींद्र कंद यांनी सांगितले की आम्ही संचालक शेतकऱ्यांच्याच बाजूने असून काही गैरसमज झाले असल्यास ते शेतकऱ्यांनी दूर करावे आणि हा बाजार फक्त शेतकऱ्यांसाठीच आणि आम्ही पण शेतकऱ्यांचे राहणार आहे .
संचालक रोहिदास उंदरे यांनी सांगितले की मांजरी उपबाजाराची संकल्पना शेतकरी ते थेट ग्राहक असून शेतकऱ्यांना दोन पैसे कसे जास्त मिळतील व ग्राहकांना ताजा माल मिळेल व विक्री करताना त्यांना दोन पैसे मिळतील यासाठी हा बाजार आहे.त्यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांनी या संकल्पनेचे स्वागत केले आहे .खोतीदार व दुबार विक्री करणारे या बाजारात शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांचा माल घेत असतात त्यामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होते. त्यामुळे येथील बाजारात खोतीदार हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे .अशी संचालकांची मागणी आहे .आम्ही शेतकऱ्यांसाठीच निवडून गेलेलो असून कितीही संघर्ष करावा लागला तरी आम्ही शेतकऱ्यांचीच बाजू घेणार असल्याचे स्पष्ट मत रोहिदास उंद्रे यांनी दिले.
मांजरी उपबाजारातील खोती-व्यापारी बंदीवर आंदोलन सलग सहा दिवसांपासून सुरु आहे. मागील काही दिवसांपासून खोतीदार आणि व्यापारी यांना संचालक मंडळाने विक्रीची परवानगी दिली तेव्हापासून शेतकरी देशोधडीला लागला आहे. बेसुमार आवक झाल्याने सगळ्या शेतमालाचा भाव मातीमोल होतो आहे. अनेक शेतकरी बांधवांनी शेतमाल फुकट दिला आहे तर काही ठिकाणी तो माल रस्त्यावर आणून विकावा लागल्याच्या भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकरी वर्गाच्या हक्काचा बाजार असून देखील मागील चार दिवसांपासून शेतकरी वर्गाचे अगणित नुकसान होत आहे या सर्वाचा निषेध म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलनाच्या सहाव्या दिवशी विरोध करण्यासाठी निषेध सभा घेतली. अनेक ग्रामपंचायत आणि शेतकरी बांधवांनी सह्यांची मोहिम राबवत आंदोलनाला पाठिंबा देखील देत आहेत. बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक रवींद्र कंद यांनी देखील आज आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. आमची ताकद आज तिप्पट झाल्याचा आम्हाला विश्वास तयार झाला आहे. मिळणारा पाठिंबा हा आमच्या लढ्याला बळ देत आहे. शेतकरी वर्गाला योग्य न्याय मिळत नाही तोवर आम्ही #लोकशाही पद्धतीने या निर्णयाचा विरोध करत राहू. जय जवान ! जय किसान ! -सुदर्शन चौधरी, संचालक – कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे